Ad will apear here
Next
अशी बहरली आपली मराठी भाषा

बाराव्या शतकाच्या आधीच शिलालेख आणि ताम्रपटातून मराठीची पावले दिसू लागली होती. कोणत्याही भाषेचा विकास ही काही अचानक घडणारी गोष्ट नव्हे. ती एक दीर्घकालीन प्रक्रिया असते. ही प्रक्रिया घडताना तत्कालीन समाज, त्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी, त्या काळातले ताणतणाव आणि समूहमन या सगळ्यांचा सहभाग असतो. आणि मराठी साहित्याच्या प्रांगणातही हे प्रत्येक टप्प्यावर ठळकपणे दिसून येते. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने, मराठी भाषेच्या विकासाच्या टप्प्यांचा घेतलेला धावता आढावा.... 
...........
मराठी माणूस म्हणजे कोण, त्याची ओळख करण्याची एक साधी-सोपी, पण अर्थपूर्ण व्याख्या आचार्य प्र. के. अत्रे यांनी केली होती. ज्याला तुकोबाचा एखादा तरी अभंग तोंडपाठ येतो, तोच खरा मराठी माणूस! ग्यानबा-तुकाराम या अवीट शब्दांची गोडी मराठी मनाला वर्षानुवर्षे भुरळ घालते आहे. मराठी माणसाची आणि साहित्याची नाळ जोडलेली आहे. अभंगांच्या भक्तिभावाने रंगलेल्या आणि प्रत्यक्ष अमृताबरोबर पैज लावली, तरीही गोडीत सरस ठरणाऱ्या मायमराठी साहित्याचे दालन अनेक शतकांपासून समृद्ध आहे. बाराव्या शतकाच्या आधीच शिलालेख आणि ताम्रपटातून मराठीची पावले दिसू लागली होती. कोणत्याही भाषेचा विकास ही काही अचानक घडणारी गोष्ट नव्हे. ती एक दीर्घकालीन प्रक्रिया असते. ही प्रक्रिया घडताना तत्कालीन समाज, त्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी, त्या काळातले ताणतणाव आणि समूहमन या सगळ्यांचा सहभाग असतो. आणि मराठी साहित्याच्या प्रांगणातही हे प्रत्येक टप्प्यावर ठळकपणे दिसून येते.

इ. स. १२५०नंतर देवगिरीच्या यादव राजांच्या काळात मराठीला मानाचा राजभाषेचा दर्जा मिळाला. याच सुमारास महानुभाव पंथातून मराठीच्या दालनात साहित्याची मांदियाळी चालू झाली. सर्वांसाठी खुल्या असणाऱ्या महानुभाव पंथाने जातिनिरपेक्षतेचा आणि अहिंसा तत्त्वाचा पुरस्कार केला. महानुभावांच्या मराठीविषयक आत्मीयतेच्या भावनेमुळे या पंथातील व्यक्तींनी विविध वाङ्मयप्रकारांत रचना करून मराठी साहित्य समृद्ध केले. स्मृति-संकलनात्मक गद्य चरित्रवाङ्मय ही या पंथाची महत्त्वाची देणगी आहे. चरित्रे, सूत्रवाङ्मय, टीकावाङ्मय, न्याय-व्याकरणादी शास्त्रे, क्षेत्र व व्यक्तिमहात्म्यवर्णने, स्तोत्रे इत्यादी वैविध्यपूर्ण लेखनाचा त्यात समावेश आहे. श्रीचक्रधर व श्रीगोविंदप्रभू या ईश्वरावतारांच्या लीळा त्यांच्या भक्तांकडून मिळवून म्हाइंभट्टांनी चक्रधरांच्या जीवनावरील लीळाचरित्र आणि गोविंदप्रभूंच्या जीवनावरील ऋद्धिपूरचरित्र हे प्रसंगांचे वर्णन करणारे चरित्र लिहिले. म्हाइंभट्ट हे मराठीतील आद्य चरित्रकार, तर धवळेमातृकी रुक्मिणीस्वयंवर रचणारी महदाइसा ही आद्य मराठी कवियत्री आहे. लीळाचरित्राची भाषा हा यादवकालीन मराठी गद्याच्या समृद्धतेचा नमुना. संवाद, वर्णने यामुळे ही चरित्रे एखाद्या कादंबरीप्रमाणे वेधक वाटतात. साधी, सरळ, सोपी, पण आलंकारिक भाषा, छोटी छोटी अर्थपूर्ण वाक्ये, वाक्प्रचार, म्हणी आणि अलंकृत साधेपणा हे तिचे विशेष. लीळांमधून तत्कालीन समाजजीवनाच्या विविध अंगांचे आपोआपच दर्शन घडते. भोजनपदार्थ, वस्त्रविशेष, चालीरिती, करमणुकीचे प्रकार, कायदे, सामाजिक सुरक्षितता, सण, उत्सव असे उल्लेख यात मिळतात. लीळाचरित्राने किती सुंदर गोष्टी मराठीला दिल्या. आजही आपण लहान बाळाला जी चिऊ काऊची आणि हत्ती आणि सात आंधळ्यांची जी गोष्ट सांगतो, ती लीळाचरित्रातलीच. 

एक होता कावळा, एक होती चिमणी. चिमणीचे घर होते मेणाचे... बाळ जन्माला आल्यापासून घराघरांत सांगितली जाणारी ही गोष्ट..... लीळाचरित्रात आलेली...

विठ्ठल विठ्ठल 
यानंतर मराठी सारस्वताच्या दालनात प्रवेश झाला तो महाराष्ट्राचं भूषण असलेल्या संतपरंपरेचा. विठ्ठलनामाचा गजर करत समाजातील विषमता, भेदभाव नष्ट करून अध्यात्मिक लोकशाही स्थापनेचे फार मोठे सामाजिक कार्य या परंपरेने केले. महाराष्ट्राच्या बहुतेक सर्व जातींत यामुळे संतांच्या वाङ्मयाची निर्मिती झाली. नामदेव शिंपी, गोरा कुंभार, नरहरी सोनार, सावता माळी, चोखामेळा, बंका महार, सेना न्हावी, कान्होपात्रा यांच्यासह जनाबाईंसारख्या काही स्त्रीसंतांनी भक्तिपर काव्यरचना केल्या. हे अभंग म्हणायला अगदी सोपे. चार ओळींचा बंध. घराघरातून अभंग पाठ झाले. वारकऱ्यांच्या मुखी अभंगांमुळे विठूमाऊलीच्या नामाचा सतत गजर होऊ लागला. संस्कृत भाषेत असल्यामुळे सगळ्यांना न समजणाऱ्या गीतेचा अर्थ ज्ञानेश्वर माऊलींनी मराठीत सांगितला आणि मराठी भाषेची पताका उंच नेली. वारकरी संप्रदायामुळे मराठीत तात्त्विक अधिष्ठान असलेले लेखन दृढ झाले. आणि त्याच वेळी कल्पनाविलास, अलंकार आणि भाषासौष्ठव असणारे काव्य दिमाखात शोभू लागले. स्फुट अभंगांतून विरहिणी, हमामा, घोंगडी, आंधळा, पांगळा गाय, चवाळें, ऋण, पाळणा, कापडी, वऱ्हाड, पाइक, बाळछंद, वासुदेव, डौर, हरिपाठ, मंथन, सौरी, फुगडी व टिपरी असे कितीतरी प्रकार रचले गेले.

संत बहिणाबाईंचा हा फुगडीचा अभंग बघा –

फुगडी घालिता नव्हे तुझा संग। जोवरी आहे देही तुझ्या विषयाचा रंग । 
कामक्रोधलोभे यांचा नाही जव त्याग। तोवरी वाया अवघे फुगडीचे सोंग ॥१॥
फुगडी घे विवेक धरी गे। पाहे परतोनी मागे। मग तूची हरी गे ॥धृ०॥
अहंकार दंभ मान दह्रू नको बाई। लोक - लाज भीड यासी देसवटा देई। 
कायावाचामनबुद्धि एकवटे होई। फुगडी घालिता मग देव तूचि पाही ॥२॥
परनिंदा द्वेष याचा नको करू साठा। धन विद्या पुत्र यांचा धरू नको ताठा। 
अवघे मोडूनि धरी एकभाव निष्ठा। बहिणी म्हणे तरीच तुज भेटी भगवंता॥

ज्ञानदेवांनी मराठी भाषेतले न्यून पुरते करून घेताना रसिक अक्षरे मेळविली. त्यामुळे अमृताशीसुद्धा पैज जिंकण्याची मराठीची सिद्धता या कालखंडात झाली.
शब्दब्रह्माचे वर्णन करताना त्यांची रसाळ वाणी प्रगटते -

हें शब्दब्रह्म अशेष। तेचि मूर्ति सुवेष। जेथ वर्णवपु निर्दोष। मिरवत असे॥
स्मृति तेचि अवयव।  देखा आंगीक भाव। तेथ लावण्याची ठेव। अर्थशोभा॥
अष्टादश पुराणें। तींचि मणिभूषणें। पदपद्धति खेवणें। प्रमेयरत्नांचीं॥
पदबंध नागर। तेंचि रंगाथिले अंबर। जेथ साहित्य वाणें सपूर। उजाळाचें॥
देखा काव्य नाटका। जे निर्धारितां सकौतुका। त्याचि रुणझुणती क्षुद्रघंटिका । अर्थध्वनि॥
नाना प्रमेयांची परी। निपुणपणें पाहतां कुसरी। दिसती उचित पदें माझारीं। रत्नें भलीं॥
तेथ व्यासादिकांच्या मतीं। तेचि मेखळा मिरवती। चोखाळपणें झळकती। पल्लवसडका॥


हर हर महादेव आणि दासबोध
इ. स. १३५० नंतरची दोनेकशे वर्षे महाराष्ट्रावर पारतंत्र्याचा काळोख पसरला. इस्लामी राजवटीने केलेले जुलूम आणि असहिष्णुता यांनी त्रासलेला हा काळ. या काळातले महत्त्वाचे दोन कवी म्हणजे संत एकनाथ आणि संत तुकाराम. इ. स. १६०० ते इ. स. १७०० हा कालखंड मराठी राज्यासाठी मोठा धामधुमीचा होता. या कालखंडात मुसलमानी आक्रमणांचे पारिपत्य करण्याची धमक दाखवत मराठी स्वराज्याची स्थापना झाली. याआधी मुसलमानी आक्रमणांमुळे मराठी भाषेवर फारसीचा मोठा प्रभाव होता; पण शिवाजी राजांच्या प्रयत्नांमुळे मराठी भाषेवरील फारसी शब्दांचे आक्रमण थंडावले. राजांनी मराठीत राज्यव्यवहार कोश तयार करून घेतला. मराठी भाषेला राजमान्यतेसोबत संत तुकाराम, समर्थ रामदास स्वामी यांच्यामुळे लोकमान्यताही मिळू लागली. शिवाजी महाराजांनी स्वराज्य-स्थापनेच्या कार्यासाठी महाराष्ट्राची अस्मिता जागृत करून सर्व समाज सुसंघटित करण्याचे जे कार्य आरंभिले, त्याला समर्थ रामदासांनी जोपासलेली अनुकूल अशी भूमिका पोषक ठरली. त्यामुळे रामदास ठामपणे सांगतात, की काव्यरचना म्हणजे विवेक जागे करणारे शब्दसुमन असले पाहिजेत.

कवित्व शब्दसुमनमाळा अर्थ परिमळ आगळा
तेणें संतषट्पदकुळा आनंद होय
परोपकाराकारणे कवित्व अगत्य करणें
तया कवित्वाची लक्षणें बोलिजेती
जेणे देहबुद्धी तुटे जेणें भवसिंधु आटे
जेणें भगवंत प्रगटे  या नांव कवित्व
जेणें सद्बुद्धी लागे जेणें पाषांड भंगे
जेणें विवेक जागे या नांव कवित्व

त्याच सुमाराला संस्कृत महाकाव्यांचा प्रभाव असणारे अतिशय सुंदर वृत्त-अलंकारांनी नटलेले मराठी काव्य मुक्तेश्वर, वामन पंडित यांसारखे पंडित लिहीत होते. प्रवृत्ती-निवृत्ती यांचा मिलाफ त्यांच्या काव्यामध्ये झालेला दिसतो. या काळातील काव्य वैराग्याकडून संसाराकडे वळू लागले होते. मोरोपंतामुळे आर्या वृत्त पुन्हा एकदा प्रख्यात झाले. 

सुसंगति सदा घडो सुजन वाक्या कानी पडो।
कलंक मतीचा झडो विषय सर्वथा नावडो।

अशा आर्या वृत्तातल्या रचना अजूनही मराठी मनात स्थान टिकवून आहेत.

याशिवाय शिवकल्याण, रमावल्लभदास, मोरया गोसावी, संत महिपती यांनी संतचरित्रे लिहून संतविजय, भक्तिविजय आदि ग्रंथांद्वारे मराठी भाषेत मोलाची भर घातली. श्रीधर या कवीने आपल्या हरिविजयपांडवप्रताप या काव्यांद्वारे खेड्यापाड्यात आपल्या मराठी कविता पोहोचवल्या.

डफावर थाप आणि पोवाड्याचा बुलंद आवाज 
शिवाजी राजांपासूनचा काळ हा महाराष्ट्रासाठी स्वातंत्र्याच्या संग्रामाचा काळ. लढाया, शत्रूला नामोहरम करणारे डावपेच आणि त्यामुळे समाजात असलेली अस्थिरता याचा साहित्यावरही परिणाम झालाच. भक्तिभावाची सरधोपट वाट थोडी वळली आणि रामदासांसारख्या संतांनीसुद्धा परखड, ठाम भूमिका स्वीकारली. याच काळात मनगटाच्या जोरावर वीरश्री खेचून आणणाऱ्या पराक्रमी मावळ्यांच्या आणि राजांच्या वीरगाथा, पोवाडे रचण्याची सुरुवात झाली. इ. स. १६५९मध्ये छत्रपती शिवाजी राजे यांनी अफझलखानाचा वध केला. त्या प्रसंगावर अग्निदास यांनी एक पोवाडा रचून गायला. कवी तुलसीदास यांनी सिंहगड सर करणाऱ्या तानाजीवर पोवाडा केला, तर यमाजी भास्करांनी बाजी पासलकरांवर पोवाडा रचला.

हीच परंपरा राखत पुढे पेशव्यांच्या कारकिर्दीत राम जोशी (१७६२-१८१२), अनंत फंदी (१७४४-१८१९), होनाजी बाळा (१७५४-१८४४), प्रभाकर (१७६९-१८४३) वगैरेंनी अनेक पोवाड्यांची रचना केली. ठसकेबाज शब्द, छोटे चरण असणारी शाहिरांची वाणी पराक्रमाची प्रेरणादायी वर्णने करू लागली.

लावणीची नजाकत आणि ढोलकीवर थाप
हा काल इ. स. १७०० ते इ. स. १८१८. हा पेशव्यांच्या कारकिर्दीचा काळ. मराठी राज्य आता थोडे स्थिर झाले होते. लढायांची धामधूम मंदावली होती आणि या आर्थिक स्थैर्याच्या काळात मराठी भाषा शृंगार व वीर रसामध्ये सजली. लावणी व पोवाडा हे वाङ्मयप्रकार मराठीत बहाराला आले. इतका दीर्घ काळ मराठीला निवृत्तीपर काव्याची सशक्त परंपरा होती. ती वाट सोडत आता कविताकामिनी मनोरंजनाकडे वळली. शाहीर होनाजी बाळा, राम जोशी, प्रभाकर, होनाजी बाळा, सगन भाऊ या शाहिरांनी हा काळ डफ, तुणतुणे आणि ढोलकीच्या नादाने गाजवला. 

शास्त्रीय रागदारीवर आधारित संथ चालीवरच्या लावण्या त्यांनी रचल्या. त्यांच्या मधुर कवनांच्या लावणीचे शब्दसामर्थ्य आकर्षक होते. शब्दरचना बांधीव व मुलायम होती आणि त्यात सहजता होती. शृंगाररसाचा अद्भुत प्याला शाहिरांनी रसिकांसमोर ठेवला. 

‘सुंदरा मनामध्ये भरली’ या कवनात शाहीर राम जोशी यांनी तत्कालीन महाराष्ट्रीय स्त्री सौदर्याचे मोहक वर्णन केले आहे.

सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली..
हवेलीत शिरली, मोत्याचा भांग...।।२।।
अरे गड्या, हौस नाही पुरली
म्हणोनि विरली, पुन्हा नाही फिरली
कुणाची सांग...।।२।।
नारी गं... गगगगग...जी ।।धृ.।।
जशी कळी सोनचाफ्याची
न पडू पाप्याची, दृष्टी सोप्याची
नसेल ती नार...।।२।।
अतिनाजूक, तनु देखणी...।।२।।
गुणाची खणी, उभी नवखणी
चढून सुकुमार...।।२।।
(संपूर्ण रचना वाचण्यासाठी https://goo.gl/pbDUvL येथे क्लिक करा.)

सरस लावणी रचणाऱ्या होनाजी बाळांनी काही पोवाडेही रचले आहेत. खर्ड्याच्या लढाईचा पोवाडा, रंगपंचमीचा पोवाडा, दुसऱ्या बाजीरावाचा पोवाडा, असे अनेक पोवाडे होनाजींनी रचले. शिमग्याचे पाच दिवस ते सरकारवाड्यापुढे तमाशाही सादर करत. त्यांची ही गाजलेली भूपाळी एक उत्कृष्ट काव्याचा नमुना आहे.
घनःश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला
उठिं लवकरि वनमाळी उदयाचळीं मित्र आला

आनंदकंदा प्रभात झाली उठी सरली राती
काढी धार क्षीरपात्र घेउनी धेनु हंबरती
लक्षिताती वासुरें हरि धेनु स्तनपानाला
(संपूर्ण रचना वाचण्यासाठी https://goo.gl/aakLQG येथे क्लिक करा.)

उपदेशाचे फटके
याच सुमारास फटके ही एक वैशिष्ट्यपूर्ण रचना काही शाहीर करीत होते. व्यवहारात कसे वागावे, कसे वागू नये, काय करावे, काय टाळावे, अशा गोष्टी या कवनातून शाहीर गावोगावी गाऊन दाखवत असत. अनंत फंदी हे या उपदेशपर फटक्यांचे जनक मानले जातात. हा त्यांचाच एक फटका.
उपदेशपर फटका १
लंडे गुंडे हिरसे तट्टू ह्यांचीं संगत धरु नको । 
नरदेहासी येऊन प्राण्या दुष्ट वासना धरुं नको ॥ध्रु०॥
भंगी चंगी बटकी सठकी ह्यांच्या मेळ्यांत बसुं नको। 
बिकट वाट वहिवाट नसावी धोपट मार्गा सोडुं नको ॥
संसारामधिं ऐस आपला उगाच भटकत फिरुं नको । 
(संपूर्ण रचना वाचण्यासाठी https://goo.gl/v63NkF येथे क्लिक करा.)

राजाची खबर देतसे ‘बखर’
‘बखर’ या शब्दाचा अर्थ बातमी, इतिहास, कथानक, चरित्र असा आहे. हा शब्द ‘खबर’ या फारशी शब्दापासून वर्णव्यत्यासाने आला असावा. बखरी ज्या काळात लिहिल्या गेल्या त्या काळात मराठी भाषेवर फारशी भाषेच्या असलेल्या वर्चस्वातून आला असावा; मात्र इतिहासाचार्य राजवाडे म्हणतात ‘बखर’ हा शब्द भष् ,भख्, बख् या धातूपासून आला आहे. महानुभाव पंथातील गद्य वाङ्मयानंतर सुमारे साडेचारशे ते पाचशे वर्षांचा काळ गेल्यावर पुन्हा मराठी भाषेने गद्य वाङ्मयाचे लेणे ल्याले. त्याला आणखी बहर पुढे इंग्रजी आमदानीत आला. इ. स. १७व्या शतकात स्वराज्यस्थापना झाल्यावर शिवचरित्रावर आधारित अनेक बखरी लिहिल्या गेल्या. अर्थातच त्या त्यांच्या मृत्यूनंतर १५-२० वर्षांनी लिहिल्या गेल्या. तत्कालीन राज्यांच्या महत्त्वाच्या लढायांचे वर्णन करणाऱ्या बखरी प्रामुख्याने लिहिल्या गेल्या. शिवकालापासून पेशव्यांपर्यंत बखरलेखन चालू होते. कित्येक वेळा बखर लिहिणाऱ्या लेखकाने तो काळ, ती घटना स्वतः अनुभवलेली असे. त्यामुळे इतिहासाचे साधन म्हणूनही या वाङ्मयप्रकाराकडे पाहिले जाते. बखरींमध्येच टिपणे, याद्या, निवाडे यांचासुद्धा समावेश असे; पण बखरकार हे काही इतिहासकार नव्हते. त्यांनी ऐतिहासिक हकीकती रसाळ आणि ओघवत्या भाषेत लिहिल्या. त्यामुळे भावनेने ओथंबलेल्या, फारसीमिश्रित मराठीत लिहिलेल्या जोरकस आणि ओघवत्या भाषांमधल्या त्या ऐतिहासिक कथा आहेत. बखरींमधून दख्खनी हिंदीचे रूप बघायला मिळते.

मराठी वाङ्‌मयेतिहासातील अत्यंत लालित्यपूर्ण, श्रेष्ठ वाङ्मय गुणांनी युक्त असणारी नावाजलेली बखर म्हणजे भाऊसाहेबांची बखर. पानिपतच्या युद्धाचे वर्णन करणारी दुसरी बखर म्हणजे पानिपतची बखर. लेखनकाळ इ. स. १७७०च्या आसपास. विश्वासरावाला गोळी लागताच गहिवरून येणारा भाऊ येथे दिसतो. भाऊसाहेबांची विविध रूपे लेखक चितारतो. युद्धवर्णनात त्यांचा हातखंडा आहे. वर्णनप्रसंगी तो रामायण-महाभारताच्या उपमा वापरतो. निवेदनशैली, भाषा हुबेहुब वर्णन यात लेखक वाकबगार आहे. पानिपत ही मराठ्यांच्या इतिहासातील एक शोककथा आहे आणि या शोककथेचा शोकात्म प्रत्यय बखरीत मिळतो हेच तिचे यश आहे, असे या बखरीबद्दल म्हटले जाते.

इंग्रजी आमदानीचा नवा अध्याय
१८१८मध्ये महाराष्ट्रात इंग्रजांचा अंमल प्रस्थापित झाला. त्या काळी ती मऱ्हाटी होती. इंग्रजी आमदानीच्या कालखंडात ती मराठी या नावाने रूढ झाली. इंग्रजांनी राज्य करायला सुरुवात केल्यानंतर येथील अनेक व्यवस्था बदलल्या तशी शिक्षणाची पारंपारिक व्यवस्थाही बदलली. नवीन इंग्रजी शिक्षण घेतलेल्या तरुणांना त्यामुळे जगाची ओळख होऊ लागली. विविध ज्ञानशाखांची ओळख झाली. स्वातंत्र्य, समता आणि बंधुता या नव्या जीवनमूल्यांची रुजवण होऊ लागली. याबरोबरच वेगळे साहित्यप्रकार वाचनात येऊ लागले. या कालखंडापासून संपूर्ण भारत आणि पर्यायाने महाराष्ट्रही संपूर्ण बदलला. व्यवस्था, रीतीभाती, कल्पना, मूल्य, आचार, वस्त्रे, असे सारे बदलू लागले. मुख्य म्हणजे या काळात मुद्रणाची कला भारतात आली आणि या सर्वच परिस्थितीचा साहित्यावर दीर्घकालीन परिणाम झाला. 

बंगाल आणि महाराष्ट्राने समाजसुधारणा आणि राष्ट्रवादी राजकारण या दोन्ही क्षेत्रांमध्ये फार मोठी कामगिरी बजावली. महात्मा फुले, न्या. रानडे, आगरकर, नामदार गोखले, लोकमान्य टिळक, आगरकर अशी काही मोजकी नावे उच्चारली, तरी आधुनिक महाराष्ट्राच्या राजकीय-सामाजिक योगदानाची कल्पना येऊ शकते. इंग्रजी भाषेतील वैचारिक निबंध या वाङ्मयावर आधारित निबंध लेखनाची आणि वर्तमानपत्रीय लेखनाची दमदार सुरुवात या काळखंडाचे महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. हे सर्व लेखक प्रामुख्याने समाजसुधारक होते. या लेखनात रसायनशास्त्र, ज्योतिष, गणित, साहित्य, कला, नीती आदी अनेक विषयांची माहिती येऊ लागली. अनेक वर्तमानपत्रे, नियतकालिके यासाठी लेखन आणि संपादन सुरू झाले. स्वातंत्र्याची आस आणि समाजाची उन्नती या दोहोंचा ध्यास लागलेल्या समाजधुरिणांनी भरपूर लेखन केले. टिळकांचे केसरी व मराठा हे वृत्तपत्र आणि त्यातले अग्रलेख विशेष गाजले. टिळकांनी ‘उजाडले पण सूर्य कुठे आहे ,’ ‘टिळक सुटले पुढे काय,’ ‘प्रिन्सिपॉल, शिशुपाल की पशुपाल,’ ‘टोणग्याचे आचळ,’ ‘हे आमचे गुरूच नव्हेत,’ ‘सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय?’ असा रोखठोक सवाल करणारे अग्रलेख लिहिले आणि परखडपणे मांडलेल्या मतांमुळे वृत्तपत्रातले लेखन संग्रहणीय झाले. समाज ढवळून काढणाऱ्या आणि समाजाला खडबडून जागे करणाऱ्या या लेखनामुळे मराठी लेखनाला वेगळीच धार चढली. 

मराठी ज्ञानभाषा झाली
इंग्रजी लेखनाचा या कालखंडावर जसा पगडा होता, तसाच स्वदेशी शिक्षण, स्वदेशप्रेम याच्या प्रभावातून अनेक संस्कृत ग्रंथांचा अनुवाद या काळात झाला. टिळकांचीगीतारहस्य’, ‘ओरायन’ (Orion) आणि ‘आर्क्टिक होम ऑफ वेदाज’ (Arctic home of vedas) ही अत्यंत क्लिष्ट विषय अभिनव व नावीन्यपूर्ण प्रकारे हाताळण्याच्या क्षमतेची उत्तम उदाहरणे आहेत. कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी ‘पद्यरत्नावली’ हा ग्रंथ १८६५मध्ये प्रकाशित केला. तसेच समीक्षात्मक लेखनाचा भक्कम पाया घातला. त्यांचा ‘अर्थशास्त्रपरिभाषा, प्रकरण पहिलें’ हा ग्रंथ महत्त्वाचा आहे. हा ग्रंथ म्हणजे जॉन स्टुअर्ट मिलकृत ‘प्रिन्सिपल ऑफ पोलिटिकल इकॉनमी’चे भाषांतर होय. शतपत्रे लिहिणाऱ्या लोकहितवादींनी ‘हिंदुस्थानचा इतिहास’ हे पुस्तक लिहिले. इतिहासाचार्य राजवाड्यांनी संशोधनात्मक लेखन करून इतिहासाच्या लेखनाचा पायंडा घातला. अशा प्रकारे या काळात मराठी भाषा ज्ञानभाषा म्हणून संपन्न होऊ लागली. वेगवेगळ्या ज्ञानशाखांशी आधारित अनेक लेख आणि पुस्तके या काळात लिहिली गेली. 

आधुनिक कादंबरी
१८९० साली ‘करमणूक’ नावाचे मासिक सुरू झाले. त्याचे कर्तेधर्ते होते कादंबरीकार हरि नारायण आपटे. ‘केसरी’ आणि ‘सुधारक’ यांची खडाजंगी एका बाजूला सुरू असताना आपटे यांनी आपले हे स्वतंत्र नियतकालिक सुरू केले होते. पहिल्या अंकात त्यांनी ‘करमणूक’चा उद्देश सांगितला – ‘केसरी, सुधारक एखाद्या कठोर पित्याप्रमाणें कठोर शब्दांने सांगणार व समाजाचें अप्रशस्त वर्तन झाल्यास वेळीं वाक्प्रतोदाचे तडाके लगावणार, तीच गोष्ट हें पत्र प्रेमळ मातेप्रमाणें गोड गोड शब्दांनीं व चांगल्या चांगल्या गोष्टींनीं अप्रशस्त वर्तनाबद्दल मायेचें शासन करणार... शनिवारीं संध्याकाळीं थकून भागून आल्यावर आपल्या कुटुंबांतील लहानमोठ्य़ा माणसांस जमवून खुशाल हंसत खेळत करमणूक करून ज्ञान मिळविण्याची ज्यांची इच्छा असेल त्यांचे आम्ही नम्र सेवक आहोंत.’

‘करमणूक’च्या पहिल्या अंकापासून हरिभाऊ आपटे यांची ‘पण लक्षात कोण घेतो!’ ही मराठीतील महत्त्वाची कादंबरी क्रमश: प्रसिद्ध होत होती. केशवपनासारख्या भयंकर रूढीचे दुष्परिणाम दाखवून देणारी ही कादंबरी. या कादंबरीतील अगदी सुरुवातीच्या भागातील हा उतारा पाहा -

आनंद काय किंवा खेद काय, कोणत्याही विकाराचा परिणाम, लहान वयात मनावर फार वेळ कधीच टिकत नाही. या माझ्या म्हणण्याचा अनुभव प्रत्येकास असेलच. तेव्हा त्याच्याविषयी विशेष फोड करून सांगण्यात काही अर्थ नाही. सध्या मला येथे एवढेच सांगावयाचे आहे, की दोन प्रहरी आगगाडीत बसण्याच्या वगैरे गर्दीत पहाटे ऐकलेले सर्व काही मी विसरून गेल्यासारखीच झाले. आगगाडीतून प्रवास करण्याच्या आनंदापुढे सकाळी ऐकलेल्या सर्व गोष्टींचा खेद तो कसचा राहणार? त्या वेळी तरी तो मी पुरता विसरून गेले असे म्हणण्यास हरकत नाही. कोणीही गावास जाऊ लागले, की गाडीत बसण्याच्या हौसेमुळे त्याजबरोबर आपण जावे असे ज्या वयात फार वाटावयाचे, त्या वयात आगगाडीतून प्रवास करण्याचा प्रत्यक्ष प्रसंग आल्यावर आणि तोही नेहमी रागवणारे बाबा बरोबर नसता; – (आमचे बाबा आमच्याबरोबर नव्हते हे येथे सांगावयास नकोच. त्यांनी आपल्या कचेरीतला कृष्णाजीपंत नावाचा कारकून आम्हांस पोचविण्यासाठी दिला होता.) मग आनंदाला हो काय विचारता? अशा आनंदापुढे, सहज ऐकलेल्या आणि ज्यांचा अर्थ मुळीच समजला नाही असे म्हटले तरी चालेल, अशा शब्दांपासून उत्पन्न झालेला खेद कितपत टिकणार? तो तेव्हाच नाहीसा झाला. असो.

ज्याप्रमाणे मोठेपणी कित्येक मंडळीस वनश्रीची शोभा पाहणे वगैरे काही आवडत नसते, त्याप्रमाणे लहानपणी कोणाचीही स्थिति नसते. त्या वयात सर्व काही पाहावेसे वाटते. कोणतीहि गोष्ट, मग त्यात कळो न कळो, आपण पाहिलीच पाहिजे ही मोठी उत्सुकता. या नियमाला अनुसरूनच अर्थात् आगगाडीत खिडकीपासल्या जागेवर कोणी बसावे, याविषयी आम्हा बहीणभावंडाचा वाद सुरू झाला. दादा म्हणे मी मोठा आहे तेव्हा मी खिडकीत बसेन आणि मी म्हणे मी बसेन. शेवटी त्या वादात खिडकीच्या बाहेर डोके काढता काढता दादाची टोपीदेखील पडली; पण नशिबाची गोष्ट एवढीच, की गाडी चालू झाली नव्हती आणि आमचे सामान आणणारा पोर्टर जवळच उभा होता; त्यास सांगून आईने ती टोपी वर आणविली. हे झाल्यावर कोणाच्या धक्क्याने टोपी पडली याबद्दल वाद कमी झाला असे मात्र समजू नका हो!

पुढे तब्बल अठ्ठावीस वर्षे सुरू राहिलेल्या ‘करमणूक’मधून हरिभाऊंनी अठरा कादंबऱ्या लिहिल्या. सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवर लिहिलेल्या या कादंबऱ्यांनी मराठीत ‘हरिभाऊ युग’च निर्माण झाले होते. त्यांच्या काळाचे प्रतिबिंब त्यांच्या कादंबऱ्यांमधून खरेपणाने उमटले.

संगीत रंगभूमी
स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये आणखी एका साहित्यप्रकाराने मोलाचे योगदान दिले ते म्हणजे महाराष्ट्राचे खास वैशिष्ट्य असणारी संगीत रंगभूमी. शास्त्रीय संगीताच्या पायावर आधारलेली संगीत नाटके या काळात अतिशय लोकप्रिय होती. याचाच उपयोग करून इंग्रजांविरुद्ध जनमानस तयार करण्यासाठी पौराणिक कथांचा आडोसा वापरून अनेक नाटके लोकप्रबोधन करू लागली. याशिवाय सामाजिक रीतीरिवाजांतील फोलपणा दाखवणारी नाटकेसुद्धा लिहिली गेली. ही परंपरा महाराष्ट्रात खूप काळ टिकली.या कलेला राजाश्रय आणि लोकाश्रयही मिळाला. अण्णासाहेब किर्लोस्कर, कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर, राम गणेश गडकरी अशी अनेक रत्ने मराठीच्या दालनात जडली.

स्त्रिया लिहू लागल्या
शिक्षणाचा परिसस्पर्श झाल्यावर पंडिता रमाबाई, काशिबाई कानिटकर, लक्ष्मीबाई टिळक अशा अनेक स्त्रियादेखील याच काळात लिहित्या झाल्या. बालविवाह, बालवैधव्य, एकत्र कुटुंबपद्धती, धार्मिक अपसमजुती यांच्यामुळे स्त्रियांना दु:खदैन्याला सामोरे जावे लागत असल्याचे पंडिता रमाबाई यांच्या ध्यानात आले. स्त्रीजीवनाच्या विविध बाजू विचारात घेऊन स्त्रीवर्गाला त्यांविषयी मार्गदर्शन केले आहे. त्यासंबंधीचा हा उतारा पाहा -

दिवसभर शेजारच्या आयाबायांपाशी जाऊन आळसावत, जांभया देत पायावर पाय ठेवून रुद्रवाती, विष्णुवाती वगैरे वळीत, अमकीचा नवरा असा आहे, ती वाकडी चालते, अमकीचे नाक वाकडे, माझी सासू फार कजाग आहे, असल्या शुष्क गोष्टीत दिवस घालवू नका. एकमेकींशी मैत्रीने वागणे व वेळप्रसंगी, परस्परांना साहाय्य करणे, हे प्रशंसनीय आहे. आपले काम नित्याचे आटोपून फावल्या वेळात, चांगल्या कामी मन न लावता रिकाम्या गोष्टी सांगत बसणे हे अगदी वाईट आहे.. मनुष्याचा स्वभाव असा आहे, की चांगले गुण त्यास लागणे फार कठीण पडते; पण दुसऱ्याचे वाईट गुण मात्र अगदी थोड्याशा वेळात जडतात. दु:सहवासांत राहिले असता आपला स्वभाव बिघडणार नाही, असा निश्चय असला, तरी तशा प्रकारच्या सहवासाच्या सावलीपाशीसुद्धा जाऊ नये. बाभळीच्या वनात एखादा चंदनवृक्ष असला आणि तेथे वणवा लागला; तर चंदनवृक्ष हा फार चांगला आहे, म्हणून काही वणव्याच्या हातून सुटका होणार नाही. काटेऱ्या झाडांबरोबर त्यासही जळून जावे लागेल.. स्वच्छ पाण्यात घाणेरडे, पाणी मिसळले तर ते तेव्हाच घाणेरडे होते, पण घाणेरड्याचे चांगले करण्यास फारच खटपट पडते..

हे पुस्तक लिहिल्यानंतर रमाबाईंनी इंग्रजी शिक्षणासाठी इंग्लंडला जाण्याचा बेत आखला; मात्र इथल्या मंडळींनी त्यांच्या परदेशगमनात अडथळे आणण्याचा प्रयत्न केला. तरीही रमाबाई इंग्लंडला जाण्यात यशस्वी झाल्या. तिथे गेल्यावर रमाबाईंनी या मंडळींच्या आक्षेपांना उत्तरे देणारे व प्रवासाचा अनुभव सांगणारे पत्र त्यांचे स्नेही स. पां. केळकर यांना पाठवले. ते केळकरांनी १८८३ साली पुस्तकरूपात प्रकाशित केले. त्याचे शीर्षक होते – ‘इंग्लंडचा प्रवास.’ हे रमाबाईंचे दुसरे मराठी पुस्तक.

ताराबाई शिंदेआधुनिकता ज्यांच्या लिखाणातून प्रखरपणे अधोरेखित झाली, अशांमध्ये ताराबाई शिंदे हे प्रमुख नाव. १८८२ साली त्यांचे स्त्रीपुरुषतुलना हे पुस्तक प्रसिद्ध झाले. स्त्रीजातीचे दु:ख, त्यांच्यावर होणारा अन्याय दूर व्हावा व त्यांना पुरुषांच्या बरोबरीचे स्थान मिळावे, अशी मांडणी ताराबाईंनी या पुस्तकात केली आहे. त्याच्या प्रस्तावनेतील हा काही भाग -

ज्या परमेश्वरानें ही आश्चर्यकारक सृष्टि उत्पन्न केली, त्यानेंच स्त्रीपुरुष निर्माण केले. तरी सर्व प्रकारचे साहास दुर्गुण स्त्रियांचेच अंगीं वसतात किंवा जे अवगुण स्त्रियांचे अंगीं आहेत तेच पुरुषांत आहेत किंवा नाहींत हे अगदीं स्पष्ट करून दाखवावें याच हेतूनें हा लहानसा निबंध मी माझ्या सर्व देशभगिनींचा अभिमान धरून रचिला आहें. यांत अमुकच जाती किंवा कुळ याकडे माझें मुळींच लक्ष नाहीं. स्त्रीपुरुषाची तुलना आहें..

हे पुस्तक लिहिण्यामागची प्रेरणा ठरली ती ‘विजयालक्ष्मी केस.’ सुरत येथील विजयालक्ष्मी या ब्राह्मण कुटुंबातील तरुण विधवेने व्यभिचार करून गर्भपात केला. त्याबद्दल सुरत न्यायालयाने तिला फाशीची शिक्षा सुनावली. पुढे मुंबई उच्च न्यायालयात अपील केल्यावर ही शिक्षा पाच वर्षांच्या सक्तमजुरीत बदलण्यात आली. या खटल्याला तेव्हा प्रचंड प्रसिद्धी मिळाली. वृत्तपत्रांतून त्याविषयी अनुकूल-प्रतिकूल मते व्यक्त होत होती. त्यातून स्त्रीजातीकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन प्रतिबिंबित होत होता. हा खटला आणि त्या अनुषंगाने ‘पुणेवैभव’सारख्या सनातनी वृत्तपत्रांनी स्त्रीजातीवर उडवलेली टीकेची झोड यांमुळे ताराबाई अस्वस्थ झाल्या आणि त्यांनी हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी रोखठोक शब्दांत स्त्रियांची कैफियत मांडली आहे. त्या पुस्तकातील हा उतारा पाहा –

अरे, जी तुह्मावर प्राणापेक्षां अधिक प्रीति करिते, तुमची आई देखील तुह्मांस लहानपणीं जपली नसेल तितकी ही आतां ऐन बाणीच्या वेळेस तुमच्या जिवास जपते; तुमच्या आज्ञेंत केवळ बिजली प्रमाणें लवते; या संसारांत नानातऱ्हांनीं तुमच्या अब्रूस कोणत्याही प्रकारें धक्का न बसावा ह्मणून जपते; जेव्हा पहावी तेव्हां सेवेंत हजर; दु:खासुखाचे वेळीं अमृताचे वल्लीप्रमाणें सदां सर्वदां सर्व सोसून निरंतर गोडच; सारांश तुह्माला जिकडून सुख होईल तें करण्यास सर्वदां तयार अशी जी ही तिला तुह्मी नानाप्रकारचे दोष देऊन या पृथ्वीतलाचे तळीं घालूं पहाता याची तुह्मांस कांहींच लाज वाटत नाहीं कारे? अरे, मूर्खानो स्त्रिया जातिनिशीं लाजाळू, नाजूक व उपजत मूर्ख. तुह्मी काय महाराज मोठे उपजत शौर्यवान, धैर्यवान, पैलवान, व्युत्पन्न, तेव्हां मातेच्या सुवर्णकुचकमंडलूंतले अमृतास ओंठ देखील लाविला नाहींच तें तुह्मी सर्व या अबलांस दिलें. कारण आपण सबल पडलांत तेव्हां हें असें करणें आपणांस कसें बरें साजेल? ह्मणून ही स्त्रीजाति अगदीं निर्बल, मूर्ख, साहसी, अविचारी; अशीं नानाप्रकारचीं निंद्य विशेषणें देऊन एकदांच त्यांच्या नांवाचा डंका ठोकलांत. त्यांना निरंतर बंदीवानासारिखे गृहतुरुंगांत कैदी करून ठेविलेत व जिथें तिथें चढती कमान करून राव बनलेत. यामुळें तुह्मांला वाटतें कीं, बायको ह्मणजे काय? अरे, ‘ज्याचे हातीं ससा तो पारधी’ बाकी सारे गैदी समजलात. लहानपणापासून आपले हातीं सारी सिक्का आनीन ठेवून स्त्री जातीला अगदीं अंधरा कोठडींत या जगापासून दूर पडद्यांत जरबेंत निरंतर बटकीसारखी ताबेदारींत ठेवून जेथें तेथें तुह्मीं आपलेच गुणांचे दिवे पाजळलेत. त्यांना न विद्या, न कोठें जाणें न येणें. गेल्या तरी तेथें त्यांच्यासारिख्याच सर्व अज्ञान. एकीसारखी दुसरी. मग जास्त ज्ञान व शहाणपण त्यांना कोठून येणार?’

ताराबाईंनी पुस्तकात तीन विषयांची मांडणी केली आहे. विधवा पुनर्विवाहाला असलेल्या बंदीमुळे स्त्रियांची होणारी कुचंबणा, विवाहित स्त्रीचे शोषण, आणि पुरुषांमधील दुर्गुण. 

आधुनिक मराठी कविता
आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणजे केशवसुत. त्यांची पिढी इंग्रजी भाषा शिकलेली, त्या भाषेतील साहित्याने प्रभावित झालेली पहिली पिढी होती. खुद्द केशवसुतांवर कीटस्, शेली, वर्डस्वर्थ यांचा संस्कार झालेला होता. केशवसुतांच्या आधी मराठी काव्याचे विषय देव-देवता, नीति-अनीती, राजे-राजवाड्यांच्या पराक्रमाचे वर्णन यांपुरतेच मर्यादित होते. संतकाव्यामागील लेखनप्रेरणा मुख्यत: आध्यात्मिक होती. पंडिती कवींनी वैयक्तिक भावभावना वर्ज्य मानल्या होत्या. आणि शाहिरी काव्य राजे-रजवाड्यांच्या स्तुतीपलीकडे पोहोचत नव्हते. केशवसुत आणि त्यानंतरच्या बालकवी, गडकरी यांनी ऐहिक विषय, लौकिक भावभावना यांची आपल्या काव्यामधून अभिव्यक्ती केली. भावगीत हेच काव्याचे खरे क्षेत्र झाले. भावगीतात्मक, प्रणयप्राधान्य, निसर्गप्रेम, सामाजिक विचार, गूढगुंजन यांचा मुक्त आविष्कार या कवितेतून दिसू लागला.

केशवसुतांनी या कवितेतून जणू नवीन युगाची तुतारी फुंकली आणि जगाचे रंग बदलण्याची इच्छा बाळगली. त्या कवितेचा काही अंश...

एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकीन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकीन सगळी गगनें
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मज आणुनी

जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी

प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!
(संपूर्ण कविता वाचण्यासाठी https://goo.gl/MABzdu येथे क्लिक करा.)

रविकिरण मंडळ
मराठी कवितेला प्रसिद्धी मिळवून देण्यात रविकिरण मंडळाचा मोठा वाटा आहे. या कवींनी काव्यगायनाची प्रथा सुरू केली. कवी यशवंतांनी तर बुलंद स्वरात कविता गाऊन ती लोकप्रिय केली. रविकिरण मंडळाच्या माध्यमातून कविता सर्वसामान्य रसिकांपर्यंत जाऊन पोहोचली. मंडळाकडून कविता वाचन, चर्चासत्र इत्यादी कार्यक्रमांचे आयोजन केले जात असे. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय व बहुमान माधवराव पटवर्धनांना जातो. रविकिरण मंडळाच्या कवितांचा फार मोठा प्रभाव शांताबाई शेळके यांच्यावर त्यांच्या संवेदनक्षम वयात पडलेला होता. ‘या मंडळींभोवती एक सोनेरी गुलाबी धूसर वलय असल्यासारखं वाटे,’ असे त्यांनी लिहून ठेवले आहे.

अर्वाचीन मराठी साहित्य
१९४५ हे अर्वाचीन साहित्याचे क्रांतिवर्ष म्हणून ओळखले जाते. देशात स्वातंत्र्याचा उदय आणि त्याच वेळी फाळणीच्या जखमा, त्यामुळे झालेल्या अमानुष कत्तली, निर्वासितांचे लोंढे यातून स्वतंत्र भारताचे गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण होऊ लागले. स्वातंत्र्याच्या ज्या कल्पनांवर आधीची पिढी विसंबली होती, ते स्वातंत्र्य प्रत्यक्षात मिळाल्यावर मात्र तसे राज्य इथे अस्तित्वात आले नाही. बेकारी, महागाई, टंचाई अशा नव्या समस्या समोर उभ्या ठाकल्या. त्यातून आलेले नैराश्य, उबग, चीड याचा आविष्कार साहित्यातून होऊ लागला.

मर्ढेकरांची कविता ‘पिपात मेले ओल्या उंदीर, बडवित टिपऱ्या’ अशा कवितांमधून हे दुःख मांडू लागल्या. विंदा करंदीकरांनी मनाला आवाहन केले – ‘माझ्या मना बन दगड.’ यांत्रिक जीवनाची माणसावर घट्ट होत जाणारी पकड, रोजच्या रेट्यात आक्रसलेले, कुचंबलेले मन, कारखानदारीत पिचणारे कामगार, वर्षानुवर्षे शोषण होत राहिलेले दलित समाज या साऱ्यांचे हुंकार पुढच्या साहित्यावर परत परत उमटत राहिले. 

गोविंदाग्रज, बालकवी, प्र. के, अत्रे, स्वातंत्र्यवीर सावरकर, कुसुमाग्रज, करंदीकर, इंदिरा संत, पु. शि. रेगे, नारायण सुर्वे, चि. त्र्यं. खानोलकर, सुरेश भट, शांता शेळके, सुधीर मोघे, ग्रेस अशा अनेक कवींनी मराठी काव्यकामिनीला आपल्या काव्याच्या हिरेमोत्यांनी जडवले. नाटक, कादंबरी, कथा, प्रवासवर्णने, ललित लेखन, विनोदी लेखन, शब्दकोश, शास्त्रीय लेखन, संशोधनात्मक लेखन, बालसाहित्य, नियतकालिके अशा अनेक अंगांनी मराठी भाषा वाढत राहिली. तिच्या अंगावर वाङ्मयीन लेणी चढत राहिली. 

आज इंग्रजी भाषेच्या रेट्यात मात्र तिचे वैभव सरणार तर नाही ना, तिला उतरती कळा तर लागणार नाही ना, अशी चिंता वाटत आहे. नवीन पिढी आज मराठी वाचत नाही, मराठीत विचार करत नाही, सुशिक्षित समाज आज मराठीला महत्त्व देत नाही, मराठी ही ज्ञानभाषा आहे आणि ती तशी टिकली पाहिजे याचे भान या वर्गात कमी होत आहे, मराठी माध्यमाच्या शाळांमधून शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी होते आहे, हे विदारक चित्र आहे; पण आपल्याच सजग प्रयत्नांमुळे या परिस्थितीतून मार्ग काढता येईल आणि ते वाढत्या तंत्रज्ञानाच्या पसाऱ्यातही करता येईल, केले जाईल अशी आशा करू या. 

माधव जूलियन यांनी १९२२मध्ये या मायबोलीची सुंदर आरती आळवली. त्यांचीच आशावादी दृष्टी समोर ठेवून आपण म्हणू या -

मराठी असे आमुची मायबोली जरी भिन्नधर्मानुयायी असूं
पुरी बांणली बंधुता अंतरंगीं, हिच्या एक ताटांत आम्ही बसूं
हिचे पुत्र आम्ही हिचे पांग फेडूं वसे आमुच्या मात्र हृन्मंदिरीं
जगन्मान्यता हीस अर्पूं प्रतापें हिला बैसवूं वैभवाच्या शिरीं 

- सुनीला गोंधळेकर
ई-मेल : sunila.gondhalekar@gmail.com
 (लेखिका मराठी भाषेच्या अभ्यासक आहेत.)

(वेगवेगळ्या कालखंडातील मराठी भाषेचे स्वरूप दर्शविणारी उदाहरणे या लेखाच्या लेखिका सुनीला गोंधळेकर यांनी सोबतच्या व्हिडिओत सादर केली आहेत.)

 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/LZNLCJ
Similar Posts
अशी बहरली आपली मराठी भाषा बाराव्या शतकाच्या आधीच शिलालेख आणि ताम्रपटातून मराठीची पावले दिसू लागली होती. कोणत्याही भाषेचा विकास ही काही अचानक घडणारी गोष्ट नव्हे. ती एक दीर्घकालीन प्रक्रिया असते. ही प्रक्रिया घडताना तत्कालीन समाज, त्यातल्या महत्त्वाच्या घडामोडी, त्या काळातले ताणतणाव आणि समूहमन या सगळ्यांचा सहभाग असतो. आणि मराठी
मातरभाषा...... मैतरभाषा २१ फेब्रुवारी हा आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिन म्हणून साजरा केला जातो. भाषिक आणि सांस्कृतिक विविधतेबद्दल जागरूकता निर्माण करणे हा यामागचा उद्देश आहे. २१ फेब्रुवारी २०००पासून हा दिवस साजरा केला जातो. मातृभाषेची गोडी आणि महिमा काही औरच असतो. या दिवसाच्या निमित्ताने मराठी भाषेच्या अभ्यासक सुनीला गोंधळेकर यांचे विचार आणि कविता
निजलेल्या बालकवीस : अभिवाचन - अक्षय वाटवे बालकवी म्हणजे त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांना झोपेतून उठविण्याच्या निमित्ताने त्यांचे गुणवर्णन करणारे गोविंदाग्रजांनी केलेले काव्य म्हणजे ‘निजलेल्या बालकवीस.’ ‘फारच थोड्या वेळात हे काव्य केलेले असल्यामुळे त्यात बालकवींचे यथार्थ गुणवर्णन आलेले नाही,’ असेही त्यांनी या गीताच्या प्रस्तावनेत म्हटले आहे. मंगेश
‘मराठीच्या समृद्धीसाठी व्हावीत छोटी साहित्य संमेलने’ रत्नागिरीतील अभ्यंकर-कुलकर्णी कनिष्ठ महाविद्यालयाचे निवृत्त उपप्राचार्य आणि ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीकृष्ण जोशी यांनी मराठी भाषेच्या वृद्धीसाठी छोट्या-छोट्या साहित्य संमेलनांची भूमिका स्पष्ट केली. मराठी राजभाषा दिनानिमित्ताने त्यांच्याशी साधलेला संवाद...

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language